युध्दस्य कथा (Yuddhasya Katha)
युध्दस्य कथा (Yuddhasya Katha)
Couldn't load pickup availability
पुस्तकाचे नाव : युध्दस्य कथा (Yuddhasya Katha)
लेखक : विजय देवधर (Vijay Devdhar)
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
‘युद्धस्य कथा’ या कथासंग्रहात. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आलेख कथारूपाने मांडलेला आहे. काही निराळी व आगळी वेगळी वैशिष्ठ्ये असलेल्या या कथा आहेत. हिटलरच्या खुनाचा कट ही दुसर्या महायुद्धाच्या काळातली एक ठळक घटना. हा कट कसा रचण्यात आला, पार पाडण्यात आला नि कटाचा सूत्रधार काऊट व्हान स्टाफेनबर्ग दुर्दैवाने त्यात कसा अपयशी ठरला याचे अतिशय तपशीलवार वर्णन ‘फ्यूररच्या खुनाचा कट’ या दीर्घकथेत आहे. ‘विक्षिप्त सैनिक- विल्यम प्रॉसनिक’ या अफलातून कथेमध्ये उचलेगिरीची प्रवृत्ती (क्लेप्टोमॅनिया) असलेल्या एका विक्षिप्त परंतु तितक्याच धाडसी नि शूर सैनिकाची मन थक्क करून टाकणारी हकीगत आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवरसुद्धा उचलेगिरी करणार्या या जवानाच्या करामती खरोखरच कल्पिताहूनही अद्भुत अशा आहेत. त्याची राष्ट्रनिष्ठा, स्वामीनिष्ठा नि युद्धआघाडीवरले त्याचे शौर्य या गोष्टीही विस्मयचकित करणार्या आहेत. कथासंग्रहात युद्धकाळातल्या दोन पलायन कथांचा अंतर्भाव मी मुद्दाम केलेला आहे. १९४० साली जर्मनांकडून पकडल्या गेलेल्या ‘एअरी नेव्हा’ नावाच्या एका सोल्जरच्या साहसीपलायनाची चित्तवेधक हकीगत आहे. ‘गरुडगढीतून साहसीपलायन’ या कथेत. जर्मनांनी त्याला ‘कोल्डित्झ’ या अभेद्य गढीमध्ये बंदिस्त करून ठेवले होते. तिथून आपल्या एका साथीदाराबरोबर तो कसा निसटला याची चित्तथरारक कहाणी प्रस्तुत कथेत आहे तर जोहान व्हॉल्कर नावाच्या एका जर्मन पाणबुडीवीराने एका ब्रिटिश युद्धकैदीतळावरून ब्रिटिशांना गुंगारा देऊन कसा पळ काढला याची उत्कंठावर्धक हकीगत आहे ‘जर्मन पाणबुडीवीर’ या कथेत. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबाँब टाकले व दुसरे महायुद्ध संपुष्टात आले. अणुबाँब टाकण्याच्या या मोहिमेची पूर्वतयारी कशी केली गेली, हिरोशिमावर अणुबाँब कसा टाकला गेला नि तो पडल्यावर कोणते भीषण दुष्परिणाम उद्भवले याची भयचकित करून सोडणारी वर्णने आहेत अनुक्रमे ‘हिरोशिमावरील आघात...’ व ‘... आणि नंतर घडलेला उत्पात’ या दोन कथांमध्ये अणुबाँब टाकण्याच्या मोहिमेत प्रत्यक्ष भाग घेणार्या एका वैमानिकाचे आयुष्य पश्चात्तापाच्या आगीत कसे होरपळून गेले, त्याचे मानसिक स्वास्थ्य कसे उद्ध्वस्त होऊन गेले याची करुणाजनक कहाणी आहे ‘पश्चात्तापाचा बळी’ या कथेत. विशिष्ट परिस्थितीमुळे युद्धे लादली जातात हे जरी खरे असले, तरी शेवटी युद्धामुळे मानवजातीचाच संहार होत असतो ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे म्हणूनच, युद्धाच्या कथा या जरी ‘रम्य’ असल्यातरी प्रत्यक्ष युद्ध आणि त्याची फलनिष्पत्ती ही नेहमी अतियश भयंकर नि वाईटच असते; अन् म्हणूनच विज्ञानयुगातील मानवाचे विनाशापासून रक्षण होवो, युद्ध टाळण्याची सद्बुद्धी त्याला मिळो नि सार्या जगात शांतता नांदो! हे या कथासंग्रहाच्या निमित्ताने इथे प्रकर्षाने म्हणावेसे वाटते.
Share

