Press "Enter" to skip to content

पावभाजी पुराण – आनंद देवधर

लव्ह ऍट फर्स्ट बाईट… पावभाजी

मुंबईने जगाला जसा वडापाव दिला तशीच आणखीही एक चविष्ट गोष्ट दिली. ती म्हणजे पावभाजी. मुंबईत मराठी माणसाबरोबर गुजराती माणसांचही मोठया संख्येने वास्तव्य आहे.वडापावचा जनक मराठी माणूस असेल तर पावभाजीचे ओरिजिन गुजराती आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आणि मला जे लोकांनी सांगितले त्यावरून पावभाजीला भुलेश्वर भागात एका गुजराती माणसाने जन्म दिला आहे.

पावभाजीमध्ये पाव आधी भाजी नंतर तर वडापावमध्ये वडा आधी पाव नंतर येतो. हे गौडबंगाल मला काही उमगलेले नाही. पण माझ्या आठवणीप्रमाणे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला भाजीपाव असेच म्हटले जायचे. नंतर कधीतरी पावभाजी असे नामकरण झाले…..

असो ! नावात काय आहे ? जे काही आहे सगळे ते चवीत आहे. हॉटेलिंग करणे म्हणजे मसाला डोसा खाणे किंवा उडप्याच्या हॉटेलमध्ये थाळी मारणे इतपतच आमच्या कक्षा रुंदावलेल्या होत्या. अगदी पुण्यात सुट्टीला आलो तरीसुद्धा बाहेरच्या मिसळीची चव नव्हती. बाहेर खाणे हे निषिद्धच आणि चैनीचे समजले जायचे. लाईफ स्टाईल स्पेडींग खूपच कमी होते.

पावभाजीची माझी पहिली ओळख पार्ल्याला दीनानाथ नाटय़गृहाच्या बाहेर एका गाडीवर झाली. मार्शलची पावभाजी या नावाने ती गाडी ओळखली जायची. हायजिन वगैरे गोष्टी कॉलेजमध्ये असताना परग्रहावरचा होत्या. खरंतर स्ट्रीट फूड जर खरोखर एन्जॉय करायचे असेल तर आजही त्या परग्रहावरच्याच समजाव्यात. पावभाजी हा प्रकार तात्काळ आवडून गेला. रात्री पार्टी व्हायची त्यावेळी चकना म्हणून पंकजचे वेफर्स आणि डिनरला मार्शलची पावभाजी हे समीकरण बनून गेले होते.

‘शिवसागर’ची पावभाजी ही खूप फेमस आहे. मुंबईत आणि पुण्यात. इतरत्रही शिवसागर या नावाची असंख्य हॉटेल्स आहेत. पण ओरिजनल शिवसागर हे नेहरू रोड विलेपार्ले पूर्व इथले.बारावीला असताना म्हणजे १९७७ साली आम्हाला ठाऊक झाले. एका लहानशा गाळ्यात जेमतेम २० माणसांची बसायची सोय होती. तिथून त्याची सुरुवात झाली पार्ल्यातीलच नव्हे बहुतेक जवळपासच्या एरियात पावभाजी मिळणारे ते एकमेव हॉटेल. ठिकठिकाणचे खवैय्ये तिथे पावभाजी खायला यायचे. जोडीला स्पेशल फालुदा हमखास मागवला जायचा. काळानुसार अतिपरिचयात अवज्ञा झाली. पावभाजीची चवही थोडी बिघडली. हल्ली शिवसागरमध्ये गेलो आम्ही इतरच मागवतो.

पार्ले पश्चिम येथे बजाज रोडवर ‘मारुती पावभाजी’ खूप फेमस आहे.त्या गाडीच्या शेजारी असलेल्या बिल्डिंगच्या आवारात चटया घालून रात्रीपर्यंत लोक पावभाजीचा आस्वाद घेत असतात. पार्सलचे तर तुफान असते. ही पावभाजी काळसर रंगाची असते आणि त्याची चव हटके आहे.

ताडदेवच्या सरदार पावभाजीचा उल्लेख केल्याशिवाय पावभाजी पुराण पूर्ण होऊच शकत नाही. कित्येक वर्षे ताडदेव सर्कलला सरदार बॅटींग करत आहे. त्या बाजूला जाणे झाले तर मित्रांना फोन करून एकत्र जमवतो आणि पावभाजी पार्ल्याला पार्सल घेऊन येतो. डाएट वगैरे करणाऱ्यांनी सरदार पावभाजीच्या नादी लागू नये. इतर ठिकाणी जितके बटर टाकतात त्याचा सुमारे पाच ते सहापट बटर असते. डिश भरल्यानंतर बटरचा एक भक्कम स्लाईस टाकला जातो. सोबत बटरमध्ये लडबडलेले दोन मोठया आकाराचे पाव येतात. त्या भाजीचा बटरमिश्रित सुगंध नाकात शिरला की ‘आक्रमण’ अशी आरोळी मारून हल्ला चढवायचा.ही भाजी पण काळसर दिसते.

तिथे रात्री जागा मिळणे हे खूप दुरापास्त असते. अशावेळी आम्ही एक किडा करतो. पार्सल घेतो आणि गाडी सुसाट वरळी सी फेसला नेतो. गार वाऱ्याच्या संगतीने,चंद्र चांदण्यांच्या साक्षीने,आदळणाऱ्या लाटांच्या बॅकग्राऊंड म्युझिकवर हा सोहळा साजरा करतो. ही मजा काही औरच आहे. विशेषतः हिवाळ्यात. बाकी मुंबईत फार कुठे पावभाजी खाल्ली नाही; आणि माझ्यासाठी आता तिची क्रेझही कमी झाली आहे.

आर्टिकल्स करत असतातना जवळपास दोन वर्षे मी ऑडिटसाठी पुण्यात काढली आहेत. त्याकाळी म्हणजे ८० च्या दशकाच्या सुरवातीला जंगली महाराज रोडला देना बँकेच्या बाहेर पावभाजीची एक गाडी लागायची तिथे अनेकदा पावभाजी खाल्ली आहे. दुसरे ठिकाण म्हणजे वैशाली हॉटेलच्या डायगॉनली अपोझिट पावभाजीची गाडी लागायची. तिथेही चविष्ट पाव भाजी मिळत असे. नंतर खूप वर्षांनी पंडित ऑटोमोबाइलच्या समोर ‘जयश्री’मध्ये पावभाजी खाल्ली. तिचा रंग थेट मारुती आणि सरदार सारखा होता हिरवट काळसर रंगाची ती पावभाजी खूप आवडली होती.

हे पावभाजी पुराण सुचलं कारण परवा पुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी जाणे झाले. दुपारी जेएम रोडवर शिवसागर. तिथे मी आता पावभाजी खातच नाही आणि अचानक ध्यानीमनी नसताना सहकारनगरमधील बहुचर्चित ‘रिलॅक्स’ पावभाजी खाण्याचा योग आला. ही खूप फेमस आहे असे मित्र मैत्रिणींनी सांगितले होते. रसभरीत वर्णने ऐकली,वाचली होती. सोचा आजमाही लेते है..

एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट खूप छान मिळते असे समजल्यावर आपण जातो आणि बरेचदा पदरी निराशा पडते. पदार्थ ओव्हरहाईप्ड असतात. रिलॅक्स याला अपवाद ठरले. तेथील पावभाजी खूपच टेस्टी होती. अपेक्षेपेक्षा चांगली निघाली फक्त पावाचा आकार लहान वाटला. या धंद्याचे खरे मार्जिन एक्सट्रा बटर जोडीत आहे.

मला पावभाजी ही पूर्ण घोटलेलीच आवडते. खडा पावभाजी नावाचा प्रकार मला बिलकुल आवडत नाही. स्वतःचं अस्तित्व मिटवल्याशिवाय दुसऱ्याला आनंद देता येत नाही. तसेच या भाजीचे आहे. एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेल्यामुळे जी चव येते ती अवर्णनीय असते.

एका मैत्रिणीने मला बटाटा, फ्लॉवर, भोपळी मिरची आणि टोमॅटो याचे एकमेकांशी प्रमाण किती असावे हे सांगितले होते. करून खायला घातली नाहीये अजून. मटार ताजा असेल तर जास्त चांगला. कमीजास्त प्रमाणात भाज्या असल्या तर चव बदलते. घरी केलेल्या पावभाजीच्या चवीतही सातत्य राखणे कठीण असते.

लाल रंगाची भाजी दिसली की मला ‘ये लाल रंग कब मुझे छोडेगा’ असा प्रश्न पडतच नाही. मैं उसे तुरंत छोड देता हूं.इतक्या वर्षानंतर (योगायोग म्हणा) माझं वैयक्तिक मत असं झालं आहे की काळसर हिरव्या रंगाची पावभाजी जास्त चविष्ट लागते.

आनंद देवधर

Secured By miniOrange