Press "Enter" to skip to content

गोष्टी- पुस्तकांंच्या – शशिकला उपाध्ये

मी शाळेत असताना कराडला आम्ही ज्या वाड्यात राहायचो त्या वाड्यात स्वत: मालक आणि बिऱ्हाडकरू सगळे शिक्षक होते. त्यामुळं वाचन आणि पुस्तकांशी मैत्री आपोआप जडली. ‘पुस्तक’ हा अत्यंत प्रेमाचा विषय म्हणून हृदयात जपला गेला. वाड्याचे मालक पंडितराव सप्रे हे कवी, मराठीचे शिक्षक आणि संत साहित्याचेप्रेमी. एकदा त्यांच्या ग्रंथसंग्रहातील ‘ज्ञानेश्वरी’ कुणीतरी वाचायला म्हणून नेली. सप्रे काका विसरून गेले, कोणी नेलीय ते.

खूप दिवसांनी आठवण झाल्यावर त्यांनी चौकशी केली; पण ‘ज्ञानेश्वरी’चा पत्ता लागला नाही. पुढं दोन वर्षांनी ते काही कामा निमित्त पुण्याला गेले होते. लक्ष्मीरोडवरून जाताना जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्याकडे पुस्तके चाळताना त्यांना एक ‘ज्ञानेश्वरी’ दिसली. त्यांना वाटलं आपली प्रत हरवलीय, घेऊया ही- मग त्यांनी पाच रुपयांना ती ‘ज्ञानेश्वरी’ विकत घेतली. प्रत हातात आल्यावर पहिलं पान उघडलं तर त्यावर नाव होतं –‘पंडित सप्रे!’

रस्त्यावरच्या विक्रेत्याकडे पुस्तकांचा अक्षरशः खजिनाचा असतो. माझी आठवण आहे १९७० सालची. पुणे विद्यापीठात मी एम.ए. करत होते. ‘स्पेशल ऑथर’ म्हणून साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करत होते. एकदा संध्याकाळी लक्ष्मीरोडवरून येताना मला फूटपाथवर मांडलेल्या जुन्या पुस्तकांतील एका पुस्तकावर मला केळकरांचा फोटो दिसला; आणि माझी पावलं आपोआप तिकडं वळली.

तसं ‘जयकर ग्रंथालयात’ त्यांचं सर्व साहित्य उपलब्ध होतंच; पण हा ग्रंथ वेगळा होता. केळकरांच्या एकसष्ठी निमित्त त्यांच्या सुहृदांनी लिहिलेल्या लेखांचा तो संग्रह होता. पुस्तकाची मूळ किंमत होती एक रुपया. मला विक्रेत्याने ते दोन रुपयांना दिलं. मी ते घेतलं; आणि घरी जाऊन चाळायला लागले, तर मला त्या जाडजूड ग्रंथात एक नोट मिळाली – पाच रुपायांची!

रस्त्यावरच्या पुस्तकांची आणखी एक ह्र्द्य आठवण आहे – १९७८ सालची. त्यावेळी श्री.बाबासाहेब पुरंदरे यांची ‘शिवचरित्र व्याखानमाला’ सुरू होती. व्याखानाची वेळ होती रात्री नऊ, सुटायला रात्री अकरा वाजायचे. मी मुलांना घेऊन रोज जाऊ लागले; माझा धाकटा मुलगा सुजित त्यावेळी आठ वर्षांचा होतं. सुजितला ही व्याखाने खूप आवडायची. तो पूर्ण ऐकायचा, पण परत येताना कंटाळायचा. एक दिवस त्याला खूप झोप येत होती; कंटाळला होता. आम्ही लक्ष्मीरोडवर आलो. आता दहा मिनिटांवर घर होतं. पण तो चालेना – काय करावं कळेना.

तेवढ्यात त्याचं लक्ष फूटपाथवरच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाकडं गेलं, ‘आई, मला एक पुस्तक घे, मग मी चालीन..’ तो म्हणाला, आणि तो त्या पुस्तकांकडे पाहू लागला. मला त्याच्या योग्यतेचं पुस्तक दिसेना. त्याला शाळेत म. गांधींची गोष्ट सांगतली होती. त्यांचा फोटो त्याला परिचयाचा होतं. तो फोटो पाहून त्यानं पुस्तक उचललं – ते होतं ‘माझे सत्याचे प्रयोग’! मी पर्स चाचपली. फार पैसे नव्हते. पुस्तकाची छापील किंमत होती एक रुपया, विक्रेता ते तीन रुपयांना देत होता. घासाघीस करून दोन रुपयांना घेतलं! ते ‘सत्याचे प्रयोग’ सुजितकडं अजूनही आहे.

‘पुस्तक’ म्हटलं की न चुकता आठवण होते, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची. ती लिहिली आहे मृणालिनी जोशी यांनी. त्या शाळेत असताना बाबासाहेबांच्या शेजारी राहायच्या. वरचेवर त्यांच्या घरी जायच्या. केव्हाही गेलं तरी बाबासाहेब पुस्तकांच्या ढिगाऱ्यात वाचत किंवा लिहीत बसलेले असत. एकदा त्या म्हणाल्या, ‘बाबासाहेब, तुमच्या घरात किती पुस्तक आहेत!’ त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘बाळा, माझ्या घरात पुस्तकं नाहीत, मीच पुस्तकांच्या घरात राहतो!’

त्या पुस्तकप्रेमी बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आज ‘भिलार’ हे ‘पुस्तकांचं गाव’ विकसित झालंय, याहून आनंदाची गोष्ट कोणती!

प्रत्येक घर पुस्तकांचं व्हावं- घराची रचना करताना पुस्तकांसाठी जागा निश्र्चित केली जावी – हे स्वप्न पूर्ण होईल तो सुदिन!

शशिकला उपाध्ये , पुणे