Press "Enter" to skip to content

मराठी प्रकाशन विश्वाच्या झगमगत्या दीपमाळेतील एक छोटीशी पणती चंद्रकला प्रकाशन – शशिकला उपाध्ये

‘चंद्रकला प्रकाशन’ या संस्थेला आज अक्षयतृतीयेला ३५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमिताने चंद्रकला प्रकाशनाच्या संचालिका शशिकला उपाध्ये यांच ‘माझं पुस्तक’ या आत्मकथनातील चंद्रकला प्रकाशन संस्थेविषयी लिहिलेला लेख.

प्रत्येक प्रकाशकाला आयुष्यात किमान एकदा तरी एक प्रश्न विचारला गेलेला असतो, तो म्हणजे ‘तुम्ही प्रकाशन व्यवसायात कसे आलात?’ किंवा ‘प्रकाशन कसं सुरु केलंत?’ ज्यांना वंशपरंपरेनं हा व्यवसाय ‘तयार’ मिळालेला असतो, त्यांचं उत्तर ठरलेलं असू शकतं, ‘वडिलांचा व्यवसाय होता. लहानपणापासून जवळून पाहात होतो. हळूहळू लक्ष घालायला लागलो, आणि आता पूर्णवेळ तेच काम करतोय !’ पण माझ्या सारख्या स्वत: प्रकाशन सुरु केलेल्या प्रत्येक प्रकाशकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. कोणी स्वत: लेखक आहेत, म्हणून स्वत:चीच पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी त्यांनी ‘प्रकाशन’ सुरु केलंय; तर कोणी पुस्तक विक्रेते आहेत, इतर प्रकाशकांची पुस्तकं विकताना स्वत:च्या प्रकाशनाची पुस्तकं विकणं सोपं आहे, सहज शक्य आहे, म्हणून त्यांनी प्रकाशन सुरु केलंय; तर काहींनी केवळ पुस्तकांच्या, साहित्याच्या प्रेमातून प्रकाशन सुरु करून, पुढं व्यवसाय म्हणून चालविलं आहे. माझं उत्तर यांतल्या तिसऱ्या विभागात बसणारं आहे.

लेखनाची हौस, साहित्यावरचं आणि पुस्तकांवरचं विलक्षण प्रेम यांतूनच मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काही काळ काम केलं. ‘केसरी’ आणि ‘तरुण भारत’ मध्ये काम करताना मिळालेली लेखनाची संधी, संपादनाचा आणि प्रुफरिडींगचा अनुभव, विविध पुरवण्या आणि विशेषांक यांच्या संपादनातून मिळालेला पानांच्या रचनेचा अनुभव आणि लेखकांशी, चित्रकारांशी झालेला परिचय, ही माझी शिदोरी होती – प्रकाशनाच्या वाटचालीत मला पुढं अत्यंत उपयोगी ठरलेली.

१९७५ आणि १९७६ या दोन वर्षांत ‘केसरी’ आणि ‘सह्याद्री’ च्या दिवाळी अंकांच्या कामाचा अनुभव घेतल्यानंतर १९७७ ते १९८३ अशी सलग सहा वर्षं ‘तरुण भारत’ मध्ये ‘दिवाळी अंक’ आणि वासंतिक अंक’ या दोन वार्षिक विशेशंकांचं संपादन करण्याची मिळालेली संधी मला खूप काही शिकवून गेली. ‘तरुण भारत’ मध्ये ‘दिवाळी अंका’ च्या आखणी पासूनची सर्व जबाबदारी मुख्य संपादक वि. ना. देवधर विश्वासानं माझ्यावर टाकायचे. त्यासाठी आवश्यक तेवढं स्वातंत्र्यही मला मिळायचं. माझी नेहमीची कामं सांभाळून हे जास्तीचं काम मी करत असे.

दिवाळी अंकाचं काम सुरु झाल्यानंतर सुरुवातीला दर आठवड्याला होणाऱ्या या सर्व विभागांच्या बैठका कामाच्या शेवटच्या टप्प्यात रोज व्हायच्या. त्यावेळचे ‘तरुण भारत’ चे जनरल मॅनेजर द.म.पत्की यांच्या ऑफिसमध्ये होणाऱ्या बैठकांमधून मला इतर विभागांचं काम समजून घेण्याचीही संधी मिळायची. शिवाय त्या विभागांची जबाबदारी नसल्यानं; आणि माझं संपादकीय काम करण्यासाठी मला पुरेसं स्वातंत्र्य असल्यानं मला त्या संदर्भातील अनुभव अधिक मोकळेपणानं घेता आले.

‘तरुण भारत’ च्या विविध विषयांवरील पुरवण्या आणि विशेषांक देखणे, आकर्षक आणि वाचनीय व्हावेत यासाठी देवधर स्वतः प्रयत्नशील असत. प्रत्येक अंकाची काटेकोर आखणी करून, वेळापत्रक तयार करून, त्याप्रमाणे काम करण्यासाठी ते आग्रही असत. कामाच्या आखणीला ते फार महत्व देत. ‘प्लॅनिंग न करताही तुमचं एखादं काम यशस्वी झालंही असेल, पण तो नियम नाही; हे लक्षात ठेवून आखणी करूनच काम करा.’ असं ते सांगत. त्यांच्या या मौलिक सल्ल्याचा मला पुढंही उपयोग झाला.

दिवाळी अंक वाचनीय, देखणा झाल्याचा आनंद फक्त स्टाफ पुरताच मर्यादित न ठेवता एक छोटासा प्रकाशन सभारंभ करण्यासाठी देवधर आग्रही असत. दिवाळी अंकाचा प्रकाशन सभारंभ दिवाळीच्या साधारण आठवडाभर आधी व्हायचा. अंका इतकीच काटेकोर आखणी या समारंभाचीही असायची. दिवाळी अंकातील सर्व कवी, लेखक, चित्रकार यांना आग्रहाचं आमंत्रण असायचं. अकांची प्रत, लेख-कथा यांची कात्रणं आणि मानधनाच्या रकमेचं पाकीट असं प्रत्येक लेखकाचं कीटच मी तयार करायची. या कार्यक्रमाचं स्वरूप अनौपचारिक असायचं. उपस्थितांपैकी एकाद्या ज्येष्ठ लेखकाच्या हस्ते रंगीत वेष्टणात रिबिनीनं बांधलेला अंक प्रकाशित व्हायचा. चहा, पेढे, फुलं देऊन आनंद व्यक्त केला जायचा. मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.

या समारंभांना श्री. ज. जोशी, व. कृ. जोशी, श्रीपाद जोशी, विजय देवधर, जोत्स्ना देवधर, अनुराधा पोतदार, द. ता. भोसले, दि. बा. मोकाशी इत्यादी लेखक मंडळी उपस्थित असायची. उत्सवप्रिय ‘श्री.ज.’ आपल्या मोकळ्या स्वभावानुसार मनापासून आनंद व्यक्त करायचे. एकदा ते म्हणाले, ‘दरवर्षी मी वीसेक अंकांसाठी कथा लिहितो. त्यांतले काही अंक मला कधीतरी मिळतात, तर काही पाहायलाही मिळत नाही. कात्रणं वगैरे तर आठवणीनं फारसं कुणी देत नाहीत. तुम्ही हा कार्यक्रम करता, सन्मानानं अंक आणि मानधन दिवाळीपूर्वी देता, हा आम्हा लेखकांचा बहुमानच आहे!’ मेळाव्याला जमलेल्या सर्व लेखकांचच ते मनोगत होतं. या अशा अनुकूल वातावरणात मग या सर्व साहित्यिकांशी ‘तरुण भारत’ चा घट्ट स्नेह नसता जमला तरच विशेष !

‘तरुण भारत’ ची प्रतिनिधी म्हणून मिळालेल्या या अनुभवांचा व्यक्तिश: मला खूप फायदा झाला. मुख्यत: लेखकांशी जवळून झालेल्या परिचय आणि माझा संपादकीय कामाबद्दल त्यांच्या मनात निर्माण झालेला विश्वास हाच ‘प्रकाशन’ सुरु करण्याच्या माझा विचाराचा पाया होता.

 १९८४ च्या सुरुवातीला ‘तरुण भारत’ मधली नोकरी सोडताना पुन्हा कुठंही नोकरी करायची नाही हे मी नक्की केलं होतं मनाशी; पण दुसरं काय करायचं ते मात्र ठरवलं नव्हतं. सुदैवानं माझी नोकरी किंवा व्यवसाय ही घराची आर्थिक गरज नव्हती, त्यामुळं मला माझ्या आवडीचं काम शोधण्याची आणि करण्याची सुसंधी मिळाली होती.

नोकरी सोडल्यानंतर लेखन, साहित्य, पुस्तकं, यांची ओढ पाठ सोडत नव्हती, हे लक्षात आलं. माणूस आपल्या आवडीपासून फारसा दूर जात नाही. मीही त्याला अपवाद नव्हते. मुख्य म्हणजे मी कोणत्या प्रकारचं काम करायचं हे ठरवायचं स्वातंत्र्य मला होतं. मग मी ‘पुस्तक प्रकाशन’ व्यवसाय म्हणून सुरु करण्याचा विचार करू लागले. पत्रकारितेच्या निमित्तनं काही प्रकाशकांचा परिचयही होता. त्यांच्या कामाची थोडी-फार माहितीही होती.

‘पुस्तक प्रकाशन’ प्रक्रियेचा व्यवसाय म्हणून विचार करू लागल्यानंतर पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे ‘पुस्तक निर्मिती’ साठी आवश्यक तो अनुभव माझाजवळ असला, तरी आतापर्यंत विशेषांकांच्या निमित्तानं केलेल्या निर्मिती प्रक्रियेतला मी ‘एक’ भाग होते; पण आता मात्र मला सगळेच विभाग एकटीच्या बळावर सांभाळावे लागणार आहेत, अगदी ‘वित्तविभाग’ सुध्दा ! ते तर मोठंच आव्हान होतं. मग निर्णय पक्का करून सगळ्या आघाड्यांवर एकदमच काम सुरु केलं.

अगदी सुरवातीला एक नाव शोधायचं होतं- प्रकाशन संस्थेसाठी. ते वेगळं असावं, अन्य कुणी वापरलेलं नसावं, या दृष्टीनं शोध घेता-घेता आमच्या दोघांच्या नावातील अर्ध्या-अर्ध्या नावांचा एकत्र उपयोग करून प्रकाशनासाठी नाव तयार केलं ‘चंद्रकला’ ! शरच्चंद्र मधील ‘चंद्र’ आणि शशिकला मधील ‘कला’. ‘चंद्रकला’ आणि ‘शशिकला’ ही दोन्ही नावं समानार्थी आणि उच्चारायलाही जवळची.

त्यामुळं नव्यानं ओळख होणारे  बरेच लोक माझा उल्लेख ‘चंद्रकला’ म्हणूनच करतात. तर असं हे नाव ठरल्यावर ‘तरुण भारत’ मधले माझे परिचित चित्रकार सुरेश नावडकर यांच्याकडून ‘मोनोग्राम’ तयार करून घेतला, आणि लेटरहेडस् छापून कामाला सुरुवात केली. पाहिलं काम म्हणजे परिचित लेखकांना पत्रं लिहिली; आणि प्रकाशन सुरु करते आहे हे कळवून, लेखन सहकार्य करण्याची त्यांना विनंती केली.

अगदी सुरुवातीला ज्या लेखकांना पत्रं पाठविली त्यांत श्री.ज.जोशी, व.कृ.जोशी, द.ता. भोसले, शशिकला जाधव, विजय देवधर, वसुधा मेहेंदळे, डॉ. विजया साठे यांचा समावेश होता. आजही मला या गोष्टीचा आनंद वाटतो, की या सर्व लेखकांनी बिनशर्त सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं. या लेखकांशी चर्चा करून प्रत्येकाच्या पुस्तकाचं स्वरूप ठरविलं. मग त्यांच्याकडून साहित्य जमा होऊ लागलं. म्हणजे ‘कच्चा माल’ जमा झाला. आता पुढचं काम सुरु करायचं !

इथं प्रकर्षानं जाणवलेली एक गोष्ट म्हणजे ‘प्रकाशन व्यवसाया’ साठी कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय त्यावेळी नव्हती. चाचपडत, धडपडत, पडत, विचारातच मला ही वाटचाल सुरु करायला हवी होती. ‘भाष्यकाराते वाट पुसतू…’ माझा प्रवास सुरु झाला- ‘प्रकाशना’च्या वाटेवर. ३ मे १९८४ ला अक्षय्यतृतीया होती. त्या मुहूर्तावर प्रत्यक्ष काम सुरु केलं.

‘प्रकाशन म्हणजे काय करता तुम्ही ?’ हा प्रश्नही प्रकाशकांना नेहमी विचारला जाणारा. लेखकांच्या हस्तलिखिताच्या वाचनापासून ते छापील स्वरुपातील, उत्तम बांधणी केलेलं, आकर्षक रंगीत मुखपृष्ठ असलेलं पुस्तकं वितरकांमार्फत वाचकांपर्यंत पोचवण्याचं काम करणारा घटक – म्हणजे प्रकाशक ! थोडक्यात सांगायचं तर लेखकांपासून ते वाचकांपर्यंतच्या सर्व घटकांना एकत्र आणणारा ‘संघटक’ (कोओर्डीनेटर) म्हणजे प्रकाशक ! हे सगळं मी आत्ता अगदी व्यवस्थित सांगू शकत असेल तरी त्यावेळी अज्ञानीच होते.

अशा अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर मी सुरु केलेल्या कामात मला अनेकांची मोलाची मदत झाली. त्यांतलं पहिलं महत्त्वाचं नाव म्हणजे ‘माधुरी मुद्रण’ चे अनंत चिंचणीकर. चिंचणीकर कंपोज-छापाईची कामे करत असत. चिंचणीकरांनी मला वेळेत पुस्तकं तयार करून देण्याचं आश्र्वासन दिलं; आणि बिलासाठी क्रेडित देण्याचंही मान्य केलं. हे सगळं झालं तरी कागदासाठी मात्र लगेचच रोख पैसे मोजावे लागणार होते.

पहिल्या संचात सहा पुस्तकं करायची होती. मग सगळ्या खर्चाचा साधारण अंदाज काढला, सगळा मिळून जवळ –जवळ पंचाहत्तर हजार रुपये खर्च येणार होता. शिवाय प्रकाशन क्षेत्रातल्या पदार्पणातला हा पहिला संच असल्यानं एखादा प्रकाशन सभारंभही करायला हवा होता. त्याचाही खर्च जमेस धरणं आवश्यक होतं.

मग मी बँकेत गेले – कर्जाची चौकशी करायला. तिथं मात्र मजेदार अनुभव आला. ‘तुमच्या उत्पादनाचा नमुना दाखवा’, असं म्हटल्यावर जे उत्पादन अजून झालेलंच नाही, किंवा ज्या उत्पादनखर्चासाठी मी कर्ज मागतेय त्या उत्पादनाचा नमुना मी आधी कसा दाखवणार ? दुसरं म्हणजे ‘तुमची पुस्तकं तुम्ही कशी, कुठं विकणार ? त्या दुकानदारांची, विक्रेत्यांची पत्रं द्या. बँकेला. ‘आम्ही या प्रकाशांची पुस्तकं विकणार आहोत’ म्हणून…!’ माझी पुस्तकं पहिल्या शिवाय विक्रेते कशी पत्रं देणार मला ?

बँकेचे हेलपाटे आणि वेळ फुक्कट जायला लागला, तसा मी तो नादच सोडून दिला; आणि स्वत:च्या ‘शिलकी’ तपासून, पैसे गोळा करायला आणि खर्च करायला सुरुवात केली. मनाची अवस्था व्दिधा होती. साठवलेली सगळी पुंजी खर्च करून टाकली, आणि नाहीच जमला हा व्यवसाय तर ? घातलेला पैसा योग्य प्रकारे पुन्हा जमा नाही करता आला बाजारातून तर ? आपण उगीचच या भानगडीत पडलो असंही वाटलं; पण आता कामाला सुरुवात झाल्यानंतर मागं फिरणंही अशक्य होतं. शेवटी ‘शेंडी तुटो वा पारंबी’ या थाटात काम सुरु ठेवून तडीस न्यायाचा निश्चय केला आणि तो अजून पार पाडतेय !

प्रकाशन सुरु करताना मनाशी काही गोष्टी ठरविल्या होत्या, अंधश्रद्धा, चमत्कार, अविश्वसनीय गोष्टी सांगून समाजाला मागे चार पावले मागे नेणारी पुस्तके प्रकाशित करायची नाहीत. मनोरंजना बरोबरच ज्ञानात भर घालणारी, शौर्य, साहस यांना प्रोत्साहन देणारी, समाज प्रबोधन करणारी, समाज घडविणाऱ्या व्यक्तींचे अनुभव सांगून तरुणांना घडवू शकणारी अशी पुस्तकं प्रकाशित करण्यावर भर दिला. त्यातूनच विश्व – विख्यात तत्वज्ञ जे.कृष्णमूर्ती यांचं चरित्र प्रकाशित करताना त्यांचे शिष्य कै. पमाजी पटवर्धन आणि पत्नी सुनंदा पटवर्धन यांची भेट झाली आणि जे. कृष्ण्मूर्तींची पुस्तके प्रकाशित करण्याची संधी मिळाली. नित्य जीवनाशी निगडित असणारे हे तत्वज्ञान लोकांना भावते व त्याची मागणी देखील खूप आहे.

साहस,शौर्य हे मला स्वत:ला आवडणारे विषय ! त्यामुळे विजय देवधर आणि व.कृ. जोशी यांची देखील पुस्तके मी प्रकाशित केली. विजय देवधर यांच्या ‘डेझर्टर’ या पुस्तकाच्या दहा आवृत्या प्रकाशित केल्या. त्यांची साहसकथांची पुस्तकेही विद्यार्थींना बक्षिस देण्यासाठी शाळांनी खरेदी केली. युद्धकथा, हेरकथा, गुढकथा ही वाचकांना खूप आवडतात असा माझा अनुभव आहे.

ललित साहित्या बरोबरच आरोग्याविषयी माहिती देणारी ही वाचकप्रिय होतात. चांगले आरोग्य ही समाजापुढची महत्वाची समस्या आहे. सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ.विजया साठे यांची ‘वजन फार वाढतंय !’ तसेच ‘तुमची मुले मागे तर पडत नाहीत?’, ‘आहारातून कर्करोगावर विजय’ ही पुस्तकंवाचनप्रिय ठरली. तसेच बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करणारे व योग्य मार्गदर्शन करणारे डॉ. दिलीप देवधर यांचं ‘बदलती जीवनशैली आणि आजार’ हे पुस्तकही प्रकाशित केले.

‘दास्तान-ए-नौशाद’ – शशिकांत किणीकर, ‘जे.कृष्णमूर्ती जीवन आणि जीवन दृष्टी’ – भ.ग.बापट, ‘पानशेत प्रलय आणि मी’ – मधुकर हेबळे, ‘नाच ग घुमा’ – माधवी देसाई, ‘मतीमंदाची माता सिंधूताई जोशी’ – शशिकला उपाध्ये ही चरित्रे आणि आत्मचरित्रे ही वाचकांना आवडतात. श्रीकांत पागनीस यांचं ‘कॅन्सर रिण्टर्ड’ व प्रज्ञा शहा यांचं ‘कॅन्सर माझा परम सखा’ ही आत्मकथनेही लोकांना मार्गदर्शक आणि दिलासा देणारी ठरली.

समीक्षात्मक पुस्तकांनाही अभासाकांकडून मागणी असते. ‘वि.स.खांडेकर यांचे साहित्य’, ‘विजया राजाध्यक्ष यांचे कथाविश्व’ , ‘कविश्रेष्ठ गदिमा’ श्री.के.क्षीरसागर ही पुस्तके वाचकांना आवडली.

लहान मुलांसाठी प्रयत्नपूर्वक विविध विषयांवर पुस्तके लिहून घेऊन प्रकाशित केली. प्राणी, पक्षी, वनस्पती, पर्यावरण, बोधपर गोष्टी यांचा समावेश केल्याने आमचे बालसाहित्यही मुलांना उपयुक्त ठरतात. या पुस्तकात उत्तम चित्रे, मोठा टाईप मुलांना आकर्षित करतो. ‘जपानी गोष्टी’, ‘लाली कोंबडी’, ‘रवींद्रनाथांच्या गोष्टी’ ही अनुवादित पुस्तके मुलांनासाठी प्रकाशित केली. तसेच ‘डॉ.अब्दुल कलाम’, ‘अमृतपुत्र विवेकानंद’ यांच्या चरित्रांना बाजारातून वारंवार मागणी असते.

स्वत:च्या प्रकाशनासाठी मी नेहमीच उत्तम पुस्तकांच्या शोधात असते; पण त्याच बरोबर माझाकडे कवितासंग्रह, किंवा इतर लेखन घेऊन येणारांची पुस्तके मी प्रकाशित करूनही देते. अशा पुस्तकांमध्ये ‘सर धनजीशा कुपर’, ‘राजमती’ ही चरित्रे, ‘नर्मदे धरिला पावन काठ’ हे नर्मदा परिक्रमेवरचे पुस्तक, ‘माझी कथा’ हे आत्मकथन, ‘गुड टू ग्रेट शॉप’ हे उपयुक्त पुस्तक आणि कितीतरी कविता संग्रहांचा समावेश यांत आहे.

‘चंद्रकला प्रकाशना’विषयी मला ‘आपला व्यवसाय पुढं कोण चालवेल ? का तो बंद पडेल ?’ हा प्रश्न पडत नाही. कारण प्रकाशन हा व्यवसाय व्यक्तिगत आवडीनं आणि कौशल्यानं चालविण्याचाच व्यवसाय आहे, असं मला मनापासून वाटतं. माझा आनंदासाठी मी तो सुरु केला आणि चालवत आहे. तो पुढं चाललाच पाहिजे हा माझा मुळीच अट्टाहास नाही. एकदा आमच्या या विषयावर चर्चा चालली होती. मी म्हटलं, ‘माझा व्यवसाय हा चहाच्या दुकानासारखा नाहीये, की आई – बाबा करत होते म्हणून मुलांनी तो पुढं चालू ठेवावा…’ त्यावर माझा धाकटा मुलगा सुजित म्हणाला, ‘ आई, तसाही आई – वडिलांचा एखादा व्यवसाय चहाच्या दुकानासारखा पुढं चालवणं मुळीच अवघड नाही. पण तू प्रकाशन चहाच्या दुकानासारखं चालवलेलं नाहीस…’ मला हे  प्रशस्तिपत्र जास्त मोलाचं वाटतं – अन्य कशाही पेक्षा !

१९९९ च्या फेब्रुवारी महिन्यात ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ तर्फे पुण्यात सर्व भारतीय भाषांतील प्रातिनिधिक प्रकाशकांचा दोन दिवसांचा एक मेळावा भरला होता. त्यात एका सत्रात प्रत्येक भाषेतील प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. सगळ्यांनाच व्यावसायिक अडचणी होत्या. प्रमाणात, स्वरुपात फरक असेल इतकंच. सगळी चर्चा ऐकल्यावरच, ‘फक्त आपणच अडचणीत नाही आहोत….’ एवढा दिलासा बहुतेक सर्वांना मिळाला होता.

या मेळाव्यासाठी प्रमख पाहुणे म्हणून आलेले त्यावेळेचे मध्यप्रदेशचे राज्यपाल भाई महावीर हे स्वत: हिंदीतील नामांकित लेखक. पुस्तकांवर, साहित्यावर आणि प्रकाशकांवर त्यांचं विलक्षण प्रेम. गेल्या शंभर वर्षांतील गाजलेल्या प्रकाशकांच्या प्रेरक, स्फूर्तिदायक आठवणी सांगून त्यांनी भाषणाच्या शेवटी रवींद्रनाथ टागोरांची एक गोष्ट सांगितली.

‘संध्याकाळची वेळ. पश्चिम क्षितिजावर सूर्य अस्ताला जात होता. पृथ्वीवरचा सूर्यप्रकाश हळूहळू, कणाकणानं कमी होत होता. अंधाराचं साम्राज्य सगळीकडं पसरत होतं; आणि एकदम सूर्य क्षितिजाआड गेला. काळ्याकुट्ट अंधारानं पृथ्वीला व्यापून टाकलं. पुढच्या क्षणी अंधारातून एक आवाज आला, ‘या अंधारात पृथ्वीला कोण प्रकाश देईल ?’ कोणही उत्तर दिलं नाही. पुन्हा तोच आवाज आला, ‘या अंधारात पृथ्वीला कोण प्रकाश देईल ?’ आणि अंधारातून एक छोटासा प्रकाशकिरण पुढं आला, म्हणाला, ‘मी पृथ्वीला प्रकाश देईन !’ तो एका छोट्याशा दिव्याचा किरण होता. गोष्ट सांगून झाल्यावर भाई महावीर म्हणाले, ‘अंधारात पृथ्वीला प्रकाश देणारा ‘तो’ दिवा तुम्ही व्हा !

उत्तम पुस्तकांची निर्मिती करून ज्ञानाचा दिवा लावा, तेवत ठेवा आणि अज्ञान दूर करायचा प्रयत्न करा !’ क्षणभराच्या शांततेनंतर सभागृहामधून टाळ्यांचा कडकडात झाला.

ही कथा माझ्या कायम लक्षात राहिलीय. ‘तो’ छोटासा दिवा मी माझ्या प्रकाशनाच्या रुपानं तेवत ठेवला आहे. मराठी प्रकाशन विश्वाच्या ‘झगमगत्या दीपमाळे’ तील ती एक छोटीशी पणती आहे.

शशिकला उपाध्ये

Secured By miniOrange