Press "Enter" to skip to content

उष्टं आणि खरकटं – डॉ. शरयू देशपांडे

‘ का लावलास खरकटा हात तुपाच्या डब्याला ? ‘ …
लहानपणी स्वयंपाकघरात लुडबूड करताना आईचा हा धमकी वजा प्रश्न, आजही मी स्वतः आईच्या भूमिकेत शिरूनही, स्वयंपाकघरात वावरताना अंगावर काटा उभा करतो. ‘खरकटं होणं’ म्हणजे काय आणि मुळात नेमकं ‘खरकटं’ कशाला म्हणतात हा प्रश्न माझ्या मनात अनेक वर्षे घर करून राहिला होता . कळत होतं पण वळत नव्हतं.

एक वेळ इतिहासातल्या सनावळ्या पाठ होतील, चक्रवाढ व्याजाचं गणित सुटेल, समांतर भुज चौकोन काढता येईल, भरलेले हौद दोन तासांत रिकामे करून चार तासांंत पुन्हा भरता येतील, मुंगळा वर्तुळाकार चालवून परीघ आणि क्षेत्रफळ मोजता येईल; पण खरकट्याची व्याख्या करणं काही जमणार नाही. एक मात्र नक्की, की सोवळ्या- ओवळ्याशी याचा काही संबंध नाही. सोवळ्यात स्वयंपाक केला तरी उष्टं-खरकटं हे नियम लागू आहेत.

अगदीच ढोबळ मानानं सांगायचं झालं, तर शिजवलेलं – भिजवलेलं अन्न यांच्या संपर्कात आलेलं ते सर्व खरकटं. गहू नाही, पण कणीक सर्व रूपांत खरकटी. तांदूळ शिजवलेले खरकटे. उष्टं आणि खरकटं ह्या दोन परस्परपूरक तरीही भिन्न संकल्पना आहेत, हेही पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर समजलं. हाता-तोंडाशी संपर्कात आलेल्या गोष्टी उष्ट्या, जेवलेलं ताट उष्टं, वाटी उष्टी; पण सिंक मध्ये गेल्यावर, बाईला घासायला दिल्यावर सगळी भांडी खरकटी.

स्वयंपाकातलं तेल-तूप देवाला वापरता येत नाही कारण ते अन्नाच्या संपर्कात आल्यामुळे खरकटं. ते उपासालाही अर्थातच चालणार नाही. पोळी-भाताचे हात नैवेद्याला लागलेले चालणार नाहीत. उपासाला लागणाऱ्या तुपाचा डबा चार कप्पे सोडून पलीकडे. हात धुतल्याशिवाय तिकडे प्रवेशच नाही.

नुसता दही-दुधाच्या पदार्थांचा नेवैद्य असेल, तर स्वयंपाकाचे हात लागलेले चालणार नाही. भात वाढून घेताना भातवाढी पानाला टेकली किंवा तुपाची धार धरताना चमचा भाताशी सलगी करायला लागला, की चापटी पडलीच हातावर म्हणून समजा!

उष्ट्याच्या तुलनेत खरकटं या संकल्पनेची व्याप्ती अधिक मोठी आहे. बरं, उष्टं आणि खरकटं या शब्दांना ‘राणीच्या भाषे’तही चपखल प्रतिशब्द नाहीत. काहीतरी जमवाजमव करता येईल, पण उष्टं आणि खरकटं या शब्दांची जी दहशत निर्माण होते ना ती कश्शा-कश्शाने निर्माण होऊ शकत नाही.  त्या शब्दांना प्रत्येकीच्या अभ्यासक्रमात आठवणींचा एक वैयक्तिक इतिहास आहे.

मलाही या संकल्पनेचं आकलन झालं नव्हतं; तरी नकळतपणे प्रशिक्षण झालेलं होतं, आणि लग्न झाल्यावर, आधुनिक विचारांच्या सासूबाईनाही उष्टे-खरकटे हात इकडे- तिकडे लावलेले चालत नाहीत हे पाहून, हे प्रकरण खरंच गंभीर आहे हे लक्षात आलं. आईने आपला या पेपरचा अभ्यास चांगला करून घेतलेला आहे, याचं समाधानही वाटलं.

हे प्रकरण समजायला, पचायला आणि अंगवळणी पडायला थोडी वर्षे गेली; पण आता मात्र मीही सरावलीये.. मुलांनी जेवताना उजव्या हाताने वाढायला घेतलं, की आवाज चढतोच… कधी चमच्याने जेवत असले, तरी चुकूनही माझ्याकडून जेवताना उजव्या हाताने अन्न वाढून घेतलं जात नाही.

या दोन्हीही संकल्पना पूर्णपणे समजल्या आहेत, असं म्हणणं अजूनही धाडसाचंच ठरेल, पण हातांनां वळण लागलंय इतकं नक्की! त्यात नकळतपणे स्वच्छता दडलेली असते, हे अगदी पटलंय. खरकट्या हातातील अन्नकण दुधा – तुपात पडले तर पदार्थ नासण्याचा धोका आहेच. या सगळ्या पद्धतींच्या मागे एक शास्त्र आहे. एक तर्कसंगत विचार आहे हे जाणवतं… मुलांनां पटवून देणं कठीण आहे; पण मग असंच आपल्यासारखं पाहून पाहून लक्षात राहील तेव्हढं… स्वच्छतेच्या दृष्टीने, पदार्थांचं आयुष्यमान वाढण्याच्या दृष्टीने आकलन व्हावं ही इच्छा …अगदीच काही नाही तर त्या शब्दांच्या निमित्ताने आईची आठवण तरी यावी ! ️

डॉ. शरयू देशपांडे, हैद्राबाद

Secured By miniOrange