Press "Enter" to skip to content

जागतिक बायसिकल दिन – आनंद देवधर

३ जून जागतिक बायसिकल दिन. बायसिकल म्हणजेच सायकल म्हंटल की पुणे आठवते. सायकलींचे शहर …

मी कोणतेही वाहन चालवत नाही जे काय चालवले आहे ते तीन चाकी ! नाही नाही ऑटोरिक्षा नाही ! लहानपणी तीन चाकी सायकल चालवली ती म्हणायची आहे मला. पुण्यात सायकल चालवली पण ती लडखडत. कधीही मला रोड कॉन्फिडन्स आला नाही. टू किंवा फोर व्हीलर कोणतेही व्हेकल असो.

पुण्यात सायकलला गाडी म्हणतात.जसजसे राहणीमान उंचावले तसे सायकलची जागा आधी स्कुटरने आणि मग मोटारसायकलने घेतली पण गाडी हे नामकरण कायम राहिले आहे.

पण आजचा विषय आहे सायकल आणि बॉलिवूड. सायकल लक्षात राहिली ती ‘जो जिता वही सिकंदर’ मुळे. मन्सूर खानने एक युथफुल सर्वांगसुंदर सिनेमा दिला होता.

हिंदी सिनेमातील गाण्यांमध्ये सायकलचा बरेचदा वापर केला गेला आहे. किशोर कुमारचीच चक्क पाच गाणी आठवली.

‘माना जनाब ने पुकारा नही…’

काळा कोट आणि पायजमा घातलेला देव आनंद त्याच्या टिपिकल स्टाइलमध्ये सायकल चालवत चालवत दोन शेपट्या घातलेल्या नूतनला “वल्लाह जवाब तुम्हारा नही है” म्हणतो.मजरुहचे बोल आणि दादा बर्मन यांचे संगीत.अजूनही कानाला सुखावून जाते. नूतनला अभिनयाच्या बाबतीत तर देवला चिरतरुण स्टाइल आयकॉन म्हणून “वल्लाह जवाब तुम्हारा नही है ” म्हणावेसे वाटते.

‘गुजर जाये दिन दिन दिन…’

योगेशचे बोल आणि सलील चौधरी यांचे संगीत असलेले ‘अन्नदाता’ मधील किशोरचे रेअर जेम. पडद्यावर ठोकळा अनिल धवन.फारसे कधी लागत नाही पण लागले की कान तृप्त करून जाते. या गाण्याबद्दल असे म्हणतात किशोर कुमार हे गाणे गायला तयारच नव्हता. परंतु सलील चौधरी यांना फक्त किशोरच हवा होता. खूप मिनतवाऱ्या केल्यानंतर शेवटी किशोर ते गायला आणि सोने करून गेला.

‘डाकिया डाक लाया…’

सुपरस्टार राजेश खन्नाची रया ओसरल्यानंतर आलेला ‘पलकों की छांव में’,गुलजार यांचे बोल आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत हे कॉम्बिनेशन असलेला बहुतेक एकमेव सिनेमा. मिशा लावलेला राजेश खन्ना पत्र वाटत फिरत असतो.एकदम टिपिकल फिल्मी वाटतो या गाण्यात.

‘इक रुत आए इक रुत जाए..’

सुभाष घई यांच्या फ्लॉप ‘गौतम गोविंदा’ मधील किशोरचे एक दुःखी छटा असलेले गाणे.आनंद बक्षी यांच्या शब्दांत दुष्काळी पार्श्वभूमी आहे. निसर्गापुढे माणूस हतबल असतो असे भाव आहेत. ‘मां की ममता नीर बहाए..’ मध्ये हा किशोरने त्याच्या टिपिकल सिग्नेचर स्टाइलने गायला आहे.ऐकलं की मन विषण्ण,खिन्न होते. हे ही गाणे रेअर जेम आहे.

‘ए मैं ने कसम ली..’

शेवटी ४ सोलोनंतर एक एव्हर ग्रीन ड्युइट… किशोर,लता हे अजरामर कॉम्बिनेशन. नीरजचे बोल आणि पुन्हा एकदा दादा बर्मन आणि देव आनंद. पिक्चर ‘तेरे मेरे सपने’ माझ्या फेव्हरेट डय़ुएट्सच्या लिस्टमध्ये खूपच वर असणारे गाणे. प्रिल्युडची सुरवात सायकलच्या घंटीने होते आणि पुढचे म्युझिक एक रोमँटिक मूड बनवत जाते. गाण्याला स्क्रीनवर देव आहे याची खात्री पटवणारा किशोरचा ठेवणीतील आवाज.या गाण्यातील तिसरे कडवे

‘एक तन है एक मन है एक प्राण अपने’

या ओळी गाताना किशोरने तादात्म्याची कमाल केली आहे…हे गाणे बघून नेहमी असे वाटते की कॉलेजमध्ये ‘त्या’ मुमताजला सायकलवर बसवून असे शेतात फिरायला जायला हवे होते. पण ती तयार झाली असती तरी जर मलाच तोल सांभाळता येत नाही तर भलती जोखीम कशाला घ्या हा विचार मनात आला असता.

स्वप्न विरून गेले असते.

आनंद देवधर

Secured By miniOrange