Press "Enter" to skip to content

चारचौघी – शुभा आपटे, शैला ढवळे-शहा, मधुराणी भागवत,सरोजनी ढवळे

माझ्या आईच्या – सौ. सरोजिनी ढवळे हिच्या काही कथा, दोघी बहिणींच्या व माझ्याही काही कथा अशा चौघींचं लेखन एकत्र करून पुस्तक प्रकाशित करावं, अशी कल्पना डोक्यात येण्याचं कारण म्हणजे माझी बहीण आशा – आत्ताची शुभा आपटे हिने १९७० च्या सुमारस एक लघुकादंबरी लिहायला घेतली होती. बोलताबोलता कशावरून तरी लेखनाचा विषय निघाला, तेव्हा मला हे कळलं; आणि मग ती ‘पूर्ण कर’ म्हणून मी तिच्या मागे लागले.

आम्हा बहिणींना लेखनाचा वारसा आमचे आजी-आजोबा, आई-वडील, मावश्या या सर्वांकडून लाभला आहे. शैला शहा या माझ्या बहिणीनेही बरंच लेखन केलं असल्याचं माझ्या निदर्शनाला आलं. मी तिच्या मागेही ते प्रसिद्ध करण्याबद्दल तगादा लावायला सुरुवात केली. आजपर्यंत या दोघींनीही त्याचं कोणतंच लेखन प्रसिद्ध केलेलं नाही.

माझ्या आईच्या तीन कादंबऱ्या ६०-७० वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाल्या; पण आई तिच्या वयाच्या ६०व्या वर्षीच गेल्या मुळे तिचं बरंचसं लेखन अप्रसिद्धच राहून गेलं. तिच्या ज्या अप्रकाशित कथा मिळाल्या, त्याही प्रसिद्ध कराव्या असं बरेच दिवस मनात होतं. माझ्या या प्रयत्नांना माझ्या दोघी बहिणींकडून प्रतिसाद मिळाल्या मुळे आज आम्ही तिघी बहिणी व आई – आम्हा चौघींचं लेखन एकत्रितपणे वाचकांपुढे ठेवण्याचा योग आला आहे.

आशा ही माझी मावस आणि चुलत बहीणही. माझी आई व आशाची आई सख्ख्या
बहिणी – सख्ख्या जावा. त्यामुळे दुहेरी नातं! माझ्या आईची मी मोठी मुलगी
व शैला लहान. आम्हा चौघींचं एकमेकींशी नातं कायम – याचा हा खुलासा.

या पुस्तकातील बरंचसं लिखाण बऱ्याच वर्षांपूर्वीचं आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. नाहीतर कालमानाचे संदर्भ योग्य वाटणार नाहीत. एका कुटुंबातील चार व्यक्तींच्या लिखाणाची ही मिसळ वाचकांना नक्कीच चविष्ट वाटेल, असा विश्वास वाटतो.

मधुराणी भागवत


लेखक : शुभा आपटे, शैला ढवळे-शहा, मधुराणी भागवत,सरोजनी ढवळे
पृष्ठसंख्या : १६८
किंमत : रु.२००-
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन

Secured By miniOrange