Press "Enter" to skip to content

कॅफे मद्रास – आनंद देवधर

आज कामानिमित्त आयकर कार्यालय,चर्चगेट आणि परळ, येथे जाणे झाले. सुखद धक्के बसले. सकाळी वेळेवर अधिकारी लोक खुर्चीत होते आणि दुसऱ्या ठिकाणी लंच टाईम चक्क वेळेत संपला होता.

एका दिवसात दोन सुखद धक्के पचवणे अवघड होते . त्यानेच पोट भरले पण बाहेर पडताच माझाच लंच टाईम झाला नसल्याची जाणीव पोटातल्या कावळ्यांनी करून दिली. मराठमोळ्या लालबागच्या प्रसिद्ध लाडू सम्राटमधील मराठमोळ्या बटाटावड्याची थोडीशी चव क्लायंटबरोबर घेतली . छानच असतो तो !

परतीची वाट वाकडी केली कारण आज मूड होता मुंबईतील मिनी मद्रास माटुंगामार्गे खादी करून परतायचा. इथे साऊथ इंडियन स्पेशल १०-१२ हॉटेल्स आहेत. रामाश्रय आणि कॅफे मद्रास यांच्यात टॉस उडवला. किंग्ज सर्कलला भाऊ दाजी लाड मार्गावर माटुंगा स्टेशनच्या दिशेने वळलात की डाव्या बाजूला लगेच कामत बंधूंचे सुप्रसिद्ध कॅफे मद्रास लागते. गाडी वळवली. चक्क जवळ पार्किंग मिळाले.

कॅफेच्या दरवाज्यात आलो पण हॉटेल बंद होते. निराश झालो. तेव्हढ्यात पाटीकडे लक्ष गेले. दुपारी २.३० ते ४.०० बंद. मोबाईल पाहिला. हो! हल्ली वेळ बघायला पटकन मोबाईलच वापरला जातो. ३.५६ झाले होते . खिडकीतून वेटरचे लक्ष वेधायचा प्रयत्न केला. बरोबर ४ वाजता सुरु होईल का ते विचारायचे होते.एक माणूस मागून आला आणि मला म्हणाला ‘उसे बुलाके होटल नही खुलेगा. जो समय लिखा है उस समय जरूर खुलेगा.’ तो नंतर काउंटरवर बसलेला दिसला. बहुधा मालक असावा.

कॅफे मद्रास ही एक संस्था आहे. गेली ७५ वर्षे लोकांना उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ (ज्यांच्या आकारात,चवींत आणि दर्जात आदरणीय सातत्य राखले गेले आहे. ) खिलवणे हे एकच काम करत आहे. बरीच बक्षिसे मिळवली आहेत. उच्चभ्रू लोकांच्या बदललेल्या,उंचावलेल्या सवयी म्हणजेच श्रीमंती बाह्यस्वरूपाचा वातानुकूलीत आग्रह, तरुण पिढीच्या बदललेल्या चवीच्या म्हणजे चिनी इटालियन वगैरे पदार्थांना मेन्यूत नसलेले स्थान, वॅले पार्किंग नाही अशा आजच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थितीत कणा आणि बाणा ताठ ठेऊन हे हॉटेल उभे आहे. पुण्यात शोभेल असे; आणि हो यांची कोठेही शाखा नाही. येथे तुमचे टेबल तुमचेच असेल असे समजू नका; ते शेअर होऊ शकते. तशी पाटी दरवाज्यात आहे.

साठीच्या दशकात शोभतील अशा टेबलखुर्च्या, गरगर फिरणारे पंखे, फक्त दाक्षिणात्य पदार्थ बनवणारे किचन आणि खास उडीपी स्पेशल जलद सर्व्हिस. इतक्या साध्या हॉटेलमधे सर्व प्रकारच्या वयोगटातील, आर्थिक परिस्थितीतील लोक गर्दी करतात. मॅक , बर्गर किंग , सब इथे वावरणारी, हाताला सॅनीटायझर फासल्याशिवाय मिनरल वॉटरची बंद बाटलीसुद्धा न उघडणारी तरुणाई इथे सहज रमते. त्यांच्या खिशाला परवडणारे दर. चार दिवस इथेच खाल्ले, ते सुद्धा चविष्ट, तर एका मूव्हीचे मल्टिप्लेक्सचे तिकीट सहज सुटते. हल्ली मोबाईल मध्ये मान आणि मन खुपसून ताटकळत बसलेले लोक नाव पुकारले तरच मान उंचावतात आणि कान टवकारतात.

आत शिरताच सांबार, मेदूवडा डोसा, कॉफी यांचा एकत्रित परिचित दरवळ जाणवतो. नेहेमीचे यशस्वी पदार्थ आहेतच पण काही हटके, वेगळे पदार्थ आहेत. उदा. उपमापुडी इडली पुडी. एका खोलगट प्लेटमध्ये डाळखोबऱ्याच्या पातळसर चटणीत उपमा किंवा इडली बुडवतात आणि वर लाल रंगाची मलगापुडी चटणीपावडर पेरतात. अप्रतिम चव . रसम वडा, रागी डोसा, बिसिबेळी भात आहेतच. पण पाईनअँपल शिरा जबरदस्त. डाएट कंट्रोलची अल्टिमेट परीक्षा म्हणजे तो मागवायचा आणि आपण खायचा नाही . मी हे यशस्वीरित्या केले आहे. खूप त्रासाचे आहे ते.

शेवटी इथली फिल्टर कॉफी. तिचा अंगभूत कडवटपणा, साखरेशी फक्त तोंडओळख ठेऊन ती हजर होते. वन ऑफ द बेस्ट. स्टीलच्या छोट्या भांडयात दिल्या जाणाऱ्या वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेतल्याशिवाय इथली खेप पूर्ण होऊच शकत नाही.

खऱ्या मद्रासला कधी जाणे झाले नाही पण या मद्रासला बरेच वेळा गेलोय, वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळी गेलोय आणि जात राहीन. तासभर ताटकळलो आहे. मुंबईच्या खाद्यमुशाफिरीत अढळ स्थान असलेले हे हॉटेल.

आनंद देवधर

Secured By miniOrange