Press "Enter" to skip to content

‘अक्कलखाते’ या पुस्तकाचे प्रकाशन

काळाशी सुसंगत वागण्यासाठी जसे प्रत्येकाने दासबोध वाचणे गरजेचे आहे; तसेच सगळ्या आईवडीलांनी अमित करकरे यांचे ‘अक्कलखाते’ वाचणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात ‘आईवडीलांनी मुलांशी कसं वागावं’ या विषयावर यासारखं पुस्तक आलेलं नाही, असं मत जेष्ठ शिक्षणतज्ञ मीना चंदावरकर यांनी व्यक्त केलं.

अक्कलखाते’ या डॉ. अमित करकरे लिखीत पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. ‘अंतर्भूत प्रामाणिकपणा व सच्चाईने भरलेले लेखन, अत्यंत साधी सोपी भाषा, ओघवती लेखनशैली, सुंदर व समर्पक शब्दात मांडलेले उत्तम विचारांमुळे या पुस्तकाने माझे जणू मनपरीवर्तनच केले आहे.’ असंही त्या पुढे म्हणाल्या. रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी, विठ्ठलवाडी मंदिराच्या प्रांगणात हा समारंभ संपन्न झाला.

पेशाने होमिओपॅथिक डॉक्टर असलेल्या अमित करकरे यांनी २०१८ साली दर सोमवारी नियमितपणे आपल्या मुलींना ब्लॉगरूपी पत्रे लिहून त्यातून अगदी साध्या-सोप्या भाषेत, हसतखेळत, जीवनाच्या विविध पैलूंची ओळख करुन दिली. या ब्लॉगला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि वाचकांकडून आलेल्या मागणीनुसार नुकतेच पराग लोणकर यांच्या मधुश्री प्रकाशन तर्फे पुस्तकाचे प्रकाशन झाले त्याप्रसंगी मीनाताई बोलत होत्या.

‘पैसे, शेअर्स, मालमत्ता, प्रॉपर्टी तर आपण प्रत्येकजण आपल्या मुलांच्या नावावर करतो, पण यशा-अपयशातून शिकत आपण आजवर जमवलेली अक्कल कधी व कशी आपल्या मुलांच्या मदतीला येणार? असा विचार करुन आपण हे लिखाण केले. याचा वापर आज नाही तर उद्या, गरज पडेल तेव्हा माझ्या मुली करु शकतील असा मला विश्वास आहे’, असं डॉ. अमित करकरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले.

हिंगणे-सिंहगड रोड परिसरातले प्रसिध्द समाजसेवक डॉ. हिरेन निरगुडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले व आजच्या बदलत्या बालक-पालक युगात, संस्कार व शिकवण सहजपणे समजावून सांगणार्या या प्रकारच्या लेखनाचे महत्व अधोरेखीत केले. याप्रसंगी निवडक तीन लेखांचे वाचन श्रीधर पाठक, मालविका करकरे व अभय इनामदार यांनी केले. प्रकाशक पराग लोणकर यांनी मनोगत मांडले. सौ. मालविका करकरे यांनी आभार व्यक्त केले.

लेखक : डॉ. अमित करकरे 
पृष्ठसंख्या : १७२
किंमत : रु.२५०/- 
प्रकाशक : मधुश्री
 प्रकाशन


 अक्कलखाते हे पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर किल्क करा.

www.madhushree.co.in

Secured By miniOrange