Press "Enter" to skip to content

‘अग्निपंख’ वाचनाचा आगळा आनंद

भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम व समूह निर्मित तत्कालीन शक्तिशाली क्षेपणास्त्र, ज्याचं नाव, ‘अग्नी !’परकीय राष्ट्रांच्या विरोधाची क्षिती न बाळगता, सलग दोन वेळा अपयश येऊनही, प्रसारमाध्यमे, राजकीय नेतेमंडळी व संपूर्ण भारतभर होणाऱ्या टीकेच्या दबावाखाली ५०० शास्त्रज्ञांच्या धैर्यशील प्रयत्नांमुळे २२ मे १९८९ रोजी ‘अग्नी’ अवकाशात झेपावले !

शीर्षकाची उकल करून सांगायचं झाल्यास, ‘अग्निपंख’ म्हणजे ‘अग्नी चे उड्डाण !’  हे पुस्तक म्हणजे डॉ. कलाम यांचं व्यक्तिगत आयुष्य, व्यवसायिक संघर्ष, जागतिक शस्त्रस्पर्धा, तत्कालीन राजकारण व तंत्रज्ञान यांचं वर्णन केलेलं, आपल्यातील आत्मशक्तीची जाणीव करून देणारं हे स्फूर्तिदायी खंडकाव्य तथा आत्मचरित्र !

लहानपणी ज्यांना शास्त्रज्ञ व भारताचे राष्ट्रपती म्हणून मी पाहिलं ते डॉ. कलाम एक माणूस म्हणून कसे होते हे मी ‘अग्निपंख’ मधून पाहिलं.  स्वयंशिस्त, चिकाटी, समयनियोजन, कार्यव्यवस्थापन, निश्चयशक्ती, धार्मिक वृत्ती व अनुभवांतून शहाणं होत जाण्याची क्षमता ! डॉ. कलाम यांचे हे गुण मी ‘अग्निपंख’ मध्ये अनुभवले.

‘अग्निपंख’ ही कोणती रंजक कथा नाही. सनसनाटी डायलॉगबाजी, उत्कंठावर्धक प्रसंगवर्णन असं काहीही यांत नाही; असं असूनही हे पुस्तक वाचतांना डोळ्यांखालून गेलेल्या असंख्य ओळी वाचत तिथेच थांबून नजर मागे नेत- मला त्या पुन्हा वाचाव्या लागत होत्या. त्या वाचल्यानंतर त्यांतील सत्यता, सहजभाव अन् या गोष्टींचा माझ्यावर पडणारा प्रभाव यामुळे श्वास रोखला जाऊन ऊर भरून येत होता !  कंठ दाटून येत होता !

त्या ओळींमध्ये दडलेला गर्भितार्थ तात्काळ माझ्या लक्षात येत होता ! शरीराच्या नसा-नसांमधील उष्ण रक्तसंचार स्पष्टपणे जाणवत होता ! तळपायाशी एक विलक्षण ऊर्जाप्रवाह निर्मित होऊन तो विद्युतवेगाने सरसरत जाऊन धाडदिशी मेंदूला धडकल्याचा व नंतर शरीरभर पसरल्याचा साक्षात्कार मला होत होता !

संपूर्ण काया अनामिक अशा सकारात्मक ऊर्जेने भरून एक आगळाच उत्साह अंतरंगात उत्पन्न करत होती. खरोखर, ‘अग्निपंख’ मधील लेखन हे इतकं सत्य, मोहक आणि मार्मिक आहे की ते वाचतांना मी ‘मंत्रमुग्ध’ होत होतो. या पुस्तकामध्ये डॉ. कलाम यांना त्यांच्या वडिलांनी केलेले उपदेश वाचतांना मला माझ्या बालपणीचे काही प्रसंग व बाबांनी दिलेल्या शिकवणींपैकी काही गोष्टी आठवल्या..

माझे बाबा मला नेहमी म्हणत, ‘त’ म्हणलं की ‘तबेला’ असं ओळखता यायला पाहिजे प्रणव ! बाबांच्या या वाक्याचा अर्थ मला लहानपणी कधी उमगलाच नाही. दरवेळी माझ्याकडून कोणती न् कोणती चूक होई अन् अशा उपदेशात्मक विधानांचे ‘कडू काढे’ मला पाजले जात. ‘प्रत्येक गोष्टीतील अव्यक्तभाव केवळ एका इशाऱ्याच्या जोरावर अचुकपणे ओळखता यायला हवा.’ हे त्यामागील मर्म!

ते नेहमी असंही म्हणत, ‘प्रणव, चुका या सगळ्यांकडून होतात, कळत-नकळत तुझ्याकडूनही होतील;जेव्हा जेव्हा त्या होतील तेव्हा तेव्हा त्या चुका ओळख, त्या स्वीकार व त्यांना सुधार; अन् याउलट जेव्हा तू बरोबर असशील तेव्हा मात्र काहीही बोलू नकोस. स्वतःचा मोठेपणा दाखवू नकोस, तेव्हाच बोल जेव्हा तुझे शब्द फार महत्त्वाचे अन् तितकेच गरजेचे असतील. लक्षात ठेव, बोलण्याच्या बाबतीत बाळगलेला संयम हा आपल्या श्रेष्ठत्वाचं द्योतक असतो.’

बाबांचे हे शब्द मला उमजत नसत, कधी समजलेच तर पटत नसत. किंबहुना त्यातील सत्य व तथ्य जाणण्याची वैचारिक क्षमता त्यावेळी माझ्याकडे नव्हती.

‘आज जेव्हा पुस्तकातील वाक्यांचे गर्भितार्थ व लेखकांचे अव्यक्तभाव मला तात्काळ समजतात, तेव्हा बाबांनी दिलेल्या शिकवणींकडे मी माझ्या या गुणाचा उगम म्हणून पाहतो.’

 ‘अग्निपंख’ ने मला सांगितलेल्या ज्ञानरुप गोष्टी –

 • वेदनांना सामोरे गेल्याशिवाय यशनिर्मिती अशक्य !
 • माणसानं कामाविषयी संतुष्ट पण प्रगतीविषयी असमाधानी असावं.
 • संवाद साधला तर विरोधालाही शरण आणणं शक्य असतं.
 • दुसऱ्यांना समजणारा माणूस सुशिक्षित समजला जातो; पण स्वतःला समजून घेण्यातच खरं शहाणपण आहे.
 • प्रयत्नांद्वारे नियती देखील बदलता येते, फक्त आपण ती बदलू शकतो असा दृढविश्वास असायला हवा.
 • कोणतंही काम केवळ वेळापत्रकाप्रमाणे होत आहे एवढंच न पाहता ते अधिकाधिक उत्कृष्ट कसं करता येईल याकडे आपलं लक्ष असायला हवं.
 • आपल्या स्वतःच्या चुकांचं मूल्यमापन कठोरपणे करावं मात्र इतरांच्या चुकांच्या बाबतीत भरपूर सहनशील असावं.
 • कोणाचंही कौतुक करतांना ते जाहीररीत्या करावं मात्र चुका दाखवतांना खासगीपणा ठेवावा.
 • ‘मला हे जमत नाही’ असं म्हणून एखाद्या कामातून अंग काढून घेणं सोपं असतं, पण या जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करू इच्छिणाऱ्या प्रयत्नशील व्यक्तीला असं बोलणं शोभा देत नाही.
 • आपल्या शिक्षणक्रमामध्ये लिहायला, वाचायला, बोलायला शिकवतात पण लक्षपूर्वक ऐकावं कसं हे कधी कुठेही शिकवलं जात नाही. बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकूनही घेता यायला हवं.
 • प्रार्थनेमध्ये मनाला नवनव्या कल्पनांना जन्म देणारी, सृजनशक्ती निर्माण करणारी शक्ती असते. जीवनात यशस्वी होण्याकरिता जे संचित गरजेचं आहे, ते सर्व आपल्यामध्ये पूर्वीपासूनच असतं. नवनवीन कल्पना निद्रिस्तावस्थेत आधीच आपल्या मनात असतात, प्रार्थनेमुळे त्या जाग्या होतात, मुक्त होतात. कष्टाचे खतपाणी घालून त्या कल्पना जेव्हा आपण सत्यात उतरवतो तेव्हा यशाची निर्मिती होते. 
 • चुका सुधारण्याची, शंकांचं निरसन करण्याची आणि संकटांवर मात करण्याची आत्मविश्वासू वृत्ती आपण बाळगायला हवी.
 • ‘माझी कुणाला कदरच नाही, मला कोणी धार्जिणच नाही’ अशा शब्दांमध्ये रडगाणी गात बसू नये. ‘माझ्या अडचणींपेक्षा मी मोठा आहे’ असा स्वतःशीच युक्तिवाद करत, देवावर विश्वास ठेवून न डगमगता कायम पुढे जात रहावं.
 • माणसानं आयुष्यात क्षणिक आनंद व ऐषआराम यांमागे न लागता काहीतरी भरीव, शाश्वत मिळवण्यासाठी अखंड कार्य करायला हवं.
 • जी माणसे श्रेय घेण्याच्या बाबतीत निरपेक्ष असतात, त्यांच्या हातून देव प्रचंड मोठी कामे घडवून आणतो. यश मिळवण्यासाठी ते हाताळण्यास आपण विनम्र आहोत असे आपल्याला देवाकडे सिद्ध करावे लागते.
 • प्रत्येक माणूस हा इतरांपेक्षा वेगळा असतो. तरीही त्या सर्वांना बांधणारा दैवी अंश प्रत्येकात असतो. संकटे आली, दुःखे भोगावी लागली तरी माणसाने धीर सोडू नये. न घाबरता त्यांना सामोरे जावे. आपल्या दुःखाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. संकटे ही माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात.

स्पष्टोक्ती – 

कोणतंही पुस्तक वाचताना त्याच्या अंतरंगांशी ज्याप्रकारे आपण संलग्न होतो. त्यातून आपली स्वतःची अशी वाचनाची लय (Rhythm) निर्माण होत असते. या लयीतून आपण जेव्हा वाचन करतो, तेव्हा अनेक वाक्ये अशी डोळ्यांखालून जातात, की त्यांचे आकलन व अर्थबोध ते संपूर्ण पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीलाच होतात. अशा ओळी पुस्तकातून वेगळ्या काढल्या, तर त्यांचा प्रभाव हा तितकासा राहत नाही,  त्या ओळींची खरी शोभा ही त्या पुस्तकातच असते. 

माझ्या ज्ञानचक्षूंनी ‘अग्निपंख’ अभ्यासताना अशा दोनशेहून अधिक ओळी माझ्या दृष्टीस पडल्या. त्या ओळीमधून मिळणाऱ्या शिकवणी येथे लिहिण्याच मी जाणीवपूर्वकपणे टाळत आहे.     

‘If you deeply Observe, Each & Everything is your Teacher !’

 या वाक्याची प्रचिती ‘अग्निपंख’ वाचताना येईल. सूक्ष्म निरीक्षण करत वाचल्यास या पुस्तकाचे प्रत्येक पान आपल्याला काहीतरी सांगून जाईल. जेवढ मी इथे लिहिलंय केवळ तेवढीच शिकवण या पुस्तकातून मिळते, असा पूर्वग्रह नसावा. ‘अग्निपंख’ चे सार हे कोणत्याही परिक्षणाद्वारे सांगता येण्याजोगं नाही. त्यासाठी स्वतः ‘अग्निपंख’ वाचावंच लागेल !

आणखी काहीतरी आवर्जून सांगावस वाटत,  एक गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यातून कधीच चुकत नाही प्रत्त्येकाला त्यातून जावंच लागतं, एक अशी अवस्था जी आपल्याला स्वतःच्या मृत्यूपेक्षाही जास्त भयावह वाटते ती म्हणजे, आप्तस्वकीयांचा विरह ! जवळची व्यक्ती कायमची निघून जाण ! 

 डॉ. कलाम यांच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्ती सोडून जाण्याच्या दुःखद प्रसंगांचे वर्णन केलेली, ती पाच पान (पान क्र. ८५ ते ९०) माझ्या मनाला चटका लावून गेली. अनेक अप्रिय घटनांच्या स्मृती ज्यांचे दुःख कित्येक दिवसांपासून मनी साचून होते. ही पाच पाने वाचताना मी त्या दुःखाला डोळ्यांमधून बाहेर पडण्यास वाट मोकळी करून दिली. पुस्तक वाचतांना रडू आलं असं मी म्हणत नाही, याउलट असे म्हणेन की, त्या पाच पानांनी माझे डोळे स्वच्छ करून मनात जमलेला अनावश्यक कचरा, पाला-पाचोळा साफ करत ते पुन्हा नव्याने निर्मळ केलं. जेवढं संपूर्ण पुस्तकानं सांगितलं तेवढंच या पाच पानांनी मला सांगितलं.

 एखाद्या विषयावर मत व्यक्त करतांना जोडीला भावनाप्रदर्शन करणं हा माझा स्वभाव नाही, पण या पुस्तकातील त्या पाच पानांविषयी सांगणे मला जास्त गरजेचं वाटतं, कारण मी ‘अग्निपंख’ वाचण्याचा नव्हे, तर जगण्याचा अनुभव सांगतोय !

या पुस्तकाला ‘Inspirational, Motivational’ अशी उपमा देऊन केलेलं वर्णन मी अनेकवेळा पाहिलं. पण तेवढ्याने माझं मन वाचनप्रवृत्त झालं नाही. लहानपणापासून या पुस्तकाविषयी मी ऐकत आलो, आज ते वाचल्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो, पण सोबतच कित्येक महिन्यांपासून संग्रही असूनही वाचण्यासाठी केलेल्या विलंबाची खंत सुद्धा वाटते.

 आज या पुस्तकाविषयी आपणांस सांगतांना माझ्याकडून अशी कोणतीही गोष्ट सांगायची बाकी राहू नये, म्हणून हा दीर्घ वाचनानुभव !     

‘अग्निपंख’ मधील या ओळी मला ‘Goosebumps’ देऊन गेल्या –

‘येणाऱ्या चांगल्या वाईट दिवसांसाठी तयार रहा, त्यांना सारखेच सामोरे जा.’

‘जेव्हा ऐरण असशील तेव्हा घाव सोस अन् हातोडा होशील तेव्हा घाव घाल !’

या पुस्तकाचं नाव ‘अग्निपंख’ हेच का असावं ? याचा मी खूप विचार केला. शेवटी या प्रश्नाचं उत्तर डॉ. कलाम यांच्याच शब्दांमध्ये मिळालं –

‘स्वतःला कधीही लहान अथवा निराधार समजू नका. आपण सगळे दैवी शक्तीच्या अग्निबिंदूचा अंश स्वतःमध्ये घेऊनच जन्माला येतो. त्या अग्नीला पंख लाभावेत यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करत रहावे अन् त्या प्रकाशाने हे जग मांगल्याने भरून जावे. देवाचे आशीर्वाद सदैव तुम्हावर बरसत राहो.’

प्रणव उन्हाळे

लेखक : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अनुवाद – माधुरी शानभाग
पृष्ठसंख्या : १९५
किंमत : रु.२२०/- 
प्रकाशक :
राजहंस प्रकाशन

Secured By miniOrange